चिपळूण ः सीसीएमपी हा वैद्यकीय अभ्यासक्रम पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना शासनाने एमएमसी मध्ये नोंदणी करून त्यांना प्रमाणपत्र दिले. ही बाब न्यायालयात प्रलंबीत असताना तसेच आयएमचा विरोध असतानाही शासनाने त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे सीसीएमपी धारकांची एमएमसी मध्ये नोंदणी बंद करण्याच्या मागणीसाठी राज्यात संप पुकारलेला असताना गुरूवारपासून नियमीत ओपीडीसह अतिदक्षता विभाग बंद ठेवण्यात येत असल्याचे इंडियन मेडीकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
बंद बाबत माहिती देताना इंडियन मेडीकल असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष व चिपळूणचे अध्यक्ष डॉ. अब्बास जबले म्हणाले, बीएएमएस धारकांना आमचा विरोध नाही. शासकीय धोरणाला आमचा विरोध आहे. एमबीबीएसचा साडेचार वर्षाचा अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर अॅलोपॅथी उपचार पद्धतीस शासन मान्यता मिळते. त्याउलट सीसीएमपी धारकांचा अभ्यास केवळ एक वर्षाचा तसेच आठवड्यातील दोन दिवस शिकवणारा अभ्यासक्रम आहे. त्यामुळे अॅलोपॅथी उपचारांसाठी त्यांना मर्यादा येत असल्याने ते रूग्णांच्या दृष्टीने त्रासदायक ठरू शकते. त्यासाठी इंडियन मेडीकल असोसिएशनने सुरूवातीपासूनच सीसीएमपी धारकांना महाराष्ट्र मेडीकल कौन्सील मध्ये नोंदणी करण्यास विरोध केला आहे.
याबाबत आयएमए ने न्यायालयात देखील दाद मागितली आहे. परंतू हा विषय न्यायप्रविष्ठ असतानाही राज्य सरकारने परस्पर सीसीएमपी धारकांना एमएमसी मध्ये नोंदणी करून एकाला प्रमाणपत्र देखील दिले आहे. आयएमए ने मंगळपासून संप पुकारला आहे. त्याची दखल शासनाने घेतलेली नाही. त्यामुळे गुरूवारपासून संपुर्ण राज्यभरात आयएमएचे डॉक्टर गुरूवार पासून बेमुदत बंद पाळणार आहेत. यामध्ये जिल्हाभरातील सुमारे ६०० डॉक्टर सहभागी होणार असून नियमीत ओपीडीसह अतिदक्षता विभाग देखील बंद ठेवला जाणार आहे. शासनाने याची दखल घेऊन तत्काळ एमएमसी मध्ये सीसीएमपी धारकांची नोंदणी बबंद करावी. त्यांना प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी केली.
