लांजा: शहरातील ओझर येथील रोडवर एकमेकांना शिवीगाळ दमदाटी व भांडण करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी शहरातील दोघा युवकांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धांत सिकंदर कांबळे (वय ३४, रा.लांजा बौद्धवाडी) आणि अमित बबन जाधव (वय ३१, रा.न्हावीवाडी, लांजा) हे दोघेजण शुक्रवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास लांजा ओझर येथील सार्वजनिक रोडवर एकमेकांना शिवीगाळ, हाताच्या थोपटाने मारहाण तसेच दमदाटी करून, भांडण करून सार्वजनिक शांततेचा भंग करीत असल्याचे आढळून आले.

याप्रकरणी या दोन्ही युवकांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १९४ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सुयोग वाडकर हे करत आहेत.