मुंबई : समाजात पसरत चाललेली अराजकता आणि झुंडशाहीच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) यांच्या वतीने रविवार, 01 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता ठाण्यात लोकतंत्र बचाव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही पदयात्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे. तसेच केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, वनमंत्री गणेश नाईक, महाराष्ट्र प्रदेश स्तरावरील प्रमुख नेते आणि जिल्ह्यातील आमदार, खासदार या पदयात्रेला उपस्थित राहणार आहेत.
ही पदयात्रा सकाळी पाचपाखाडी येथील ठाणे महापालिकेजवळील परमार्थ निकेतन येथून सुरू होऊन चंदनवाडी, अल्मेडा चौक, दगडी शाळामार्गे तलावपाळी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासमोर विसर्जित होईल. त्यानंतर नेत्यांचे मार्गदर्शन होऊन या यात्रेची सांगता होईल.
सध्या देशात सुरू असलेल्या लोकशाहीविरोधी शक्तींच्या कारवायांना विरोध करून संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करत सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण पदयात्रेत ठाण्यातील सर्व नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.