जळगाव : परप्रांतीय आधी शेतकऱ्यांच्या जमिनी खात होते आता आमच्या शेतकऱ्यांचा जीव घेत आहेत. कुठे नेऊन ठेवलाय जळगाव जिल्हा माझा ? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केला आहे.
जळगाव जिल्ह्यात रेती माफियांच्या हैदोस काही केल्या कमी होताना दिसत नाही. अवैध रेती वाहतुकीस विरोध केल्याच्या कारणावरून शरद पाटील नावाच्या शेतकऱ्यांच्या अंगावर डंपर घालून त्याला चिरडून ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावरून रोहिणी खडसे यांनी संताप व्यक्त केला आहे.
रोहिणी खडसे म्हणाले की, गेल्या काही दिवसांत जळगाव जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचं पार बोजवारा उडाला आहे. भोकर तालुक्यात दरोडा काय घातला जातोय, फुलगाव येथे तरुणावर गोळीबार केला जातो. हे कमी होतं की काय तर अमळनेर तालुक्यातील नांद्री गावात एका शेतकऱ्याला वाळू माफियाने डंपरखाली चिरडलं आहे. या शेतकऱ्याने वाळू माफियांचा विरोध केला होता त्यामुळे वाळू माफियाने शेतकऱ्याला धमकी दिली होती. शेतकऱ्याने याबाबत पोलिसांत तक्रार केली होती, पण प्रशासनाने यात कोणतीही कारवाई केली नाही. शेवटी काय झालं? तर वाळू माफियाने शेतकऱ्याचा जीव घेतला. रोहिणी खडसे यांनी आरोप केला आहे की, हा डंपर हरियाणातील आहे तसेच आरटीओच्या नाकाखालून डंपर येतात आणि सर्रासपणे इथली वाळू घेऊन जातात. काही डंपरला तर नंबर प्लेट नसतात पण प्रशासन त्यावर कोणतीही कारवाई करत नाही असे त्या म्हणाल्या.
सरकारवर टीका करताना त्या म्हणाल्या की, वाळू माफियांवर प्रशासन कारवाई का करत नाही? हे काय सरकारचे जावई आहेत का ? जिल्ह्यात प्रत्येक आमदार, खासदार हा महायुतीचा आहे, ४-४ मंत्री जिल्ह्याला लाभलं आहेत पण यावर कोणीच काही बोलत नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींना सरकारचे पाठबळ आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.