मुंबई : काँग्रेसच्या राजकीय भूमिकेवर टीका करताना भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा किशोर वाघ यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसची अवस्था म्हणजे ‘अपयशाचा ब्रँड आणि नौटंकीचा कारखाना’ असल्याची टीका त्यांनी केली.
वाघ यांनी आपल्या प्रतिक्रियेत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा संदर्भ देत, “न्यायालयीन प्रक्रियेने या, राजकीय स्टंटबाजीने नाही,” असे म्हणत राहुल गांधी यांना भेट नाकारल्याचा दावा केला. जिथे जाल तिथे पराभव होत असतानाही नौटंकी थांबत नसल्याची टीकाही त्यांनी केली.
“एकीकडे १४० कोटी जनतेच्या विश्वासाचा तळपणारा सूर्य मोदीजी, तर दुसरीकडे अपयशाच्या अंधारात चाचपडणारा दिवा राहुल गांधी,” अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची तुलना केली.
जनतेने काँग्रेसला यापूर्वीही नाकारले असून, भविष्यातही त्यांच्या पराभवाचाच इतिहास लिहिला जाईल, असा दावा चित्रा वाघ यांनी केला.