मुंबई : आषाढी वारीच्या परंपरेला पर्यावरण संवर्धनाची जोड देऊन राज्यातील पालखी मार्गांचे व्यापक हरितीकरण करण्यास शासन कटिबद्ध आहे. हा उपक्रम शासन, आध्यात्मिक संस्था आणि लोकसहभागाच्या माध्यमातून लोकचळवळ म्हणून राबविण्याचे निर्देश माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी ‘निर्मल वारी’ आणि ‘हरित वारी’ उपक्रमाच्या आढावा बैठकीत दिले.
बैठकीत पालखी मार्गांवरील वृक्षारोपण आणि हरितीकरणाच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पालखी मार्गावर वृक्षसंवर्धनासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, यासाठी पंढरपूर संस्थानचे विश्वस्त तथा संत तुकाराम महाराज यांचे वंशज शिवाजीराव मोरे यांनी केलेल्या विनंतीची प्राधान्याने दखल घेत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी या उपक्रमाचे मार्गदर्शक शिवाजीराव मोरे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभिजित औटे, वन विभागाचे विवेक खांडेकर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी सेवा सहयोग फाउंडेशनचे अतुल नागरस आणि नरेंद्र वैशंपायन हेदेखील उपस्थित होते.
राज्यातील संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांवर वारकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हरित पट्टे विकसित करण्यात येत आहेत. क्रिकेटच्या सामन्यादरम्यान जेवढे डॉट बॉल पडतील, तेवढे वृक्ष लावण्याचा लोकहितकारी उपक्रम मुंबई क्रिकेट असोसिएशनने हाती घेतला आहे. या उपक्रमातूनही या पालखी मार्गांचे हरितीकरण शक्य असल्याची सूचना श्री मोरे यांनी यावेळी केली.