अलिबाग -( धम्मशील सावंत) :उन्हाळी सुट्टी आणि विकेंडचा एकत्रित परिणाम म्हणून अलिबाग-वडखळ मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. सुमारे ७ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवासी आणि पर्यटकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक सुरळीत होण्यास अडथळे येत असून, काही ठिकाणी वाहनांची हालचाल अत्यंत संथ गतीने सुरू आहे. अनेक पर्यटक तासनतास वाहतुकीत अडकून पडल्याने बेजार झाले.

स्थानिक प्रशासन आणि वाहतूक पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असले तरी वाढत्या गर्दीमुळे समस्या अधिकच गंभीर होत आहे. विकेंड आणि सुट्ट्यांच्या काळात या मार्गावर पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने, रस्ते विस्तार आणि पर्यायी मार्गांची गरज पुन्हा अधोरेखित होत आहे.
दरम्यान, प्रवाशांनी शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.