खेड : – तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील पुष्कर कंपनीच्या आवारात टाकलेले भंगार गोळा करताना एका महिलेची गरम मातीने साडी व हात भाजल्याची घटना दि. १२ मार्च २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास घडली होती. उपचारादरम्यान तिचा कोल्हापूर येथील रुग्णालयात दि. २२ मार्च २०२६ रोजी पहाटे ३:३० वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेस कारणीभूत ठरलेल्या कंपनीच्या एच.आर.मॅनेजर,सेफ्टी मॅनेजर, मालक व व्यवस्थापक अशा चौघांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शकुंतला बबन सोनवणे (४८) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ., फिर्यादी ललिता चंद्रकांत सोनावणे (सध्या रा. चिपळूण., मूळ रा.पाचगणी, ता. शिराळा, जि. सांगली ) यांची चुलत सासु शकुंतला बबन सोनावणे (४८) पुष्कर कंपनीच्या आवारात टाकलेले भंगार गोळा करताना भाजल्याने त्यांना पुढील उपचारार्थ कोल्हापूर येथील सी. आर. आर. हाॅस्पीटल, कोल्हापूर येथे दाखल केले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. कंपनी आवारातील गरम मातीने दुर्घटना होऊ शकते हे माहीत व जाणीव असतानाही निष्काळजीपणा दाखवून या महिलेच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पुष्कर कंपनीचा सेफ्टी मॅनेजर सुधाकर जगताप ., एच आर मॅनेजर सचिव बाळकृष्ण मनवळ (४३, रा. भरणे बाईतवाडी, खेड, जि. रत्नागिरी)., रविंद्रकुमार सवरमल भुतिया (५३, रा. बांदल हायस्कूल, चिपळूण, जि. रत्नागिरी )., व मालक गौतम मखरिया यांच्यासह व्यवस्थापकांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.