रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील वरवडे भाग शाळा, खंडाळा येथील मराठी विषयाचे शिक्षक तथा लघुपट निर्माते एस. के. जाधव यांच्या ‘निसर्ग’ या सामाजिक संदेश देणाऱ्या लघुपटाला नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये पहिल्या १५ निवडक लघुपटांमध्ये सहाव्या क्रमांकाचे नामांकन मिळाले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक भवनात आयोजित नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये जाधव व त्यांच्या संपूर्ण टीमचा विशेष सन्मान करण्यात आला.
छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या सोहळ्यात ऑल इंडिया पॅंथर सेनेचे अध्यक्ष दीपकभाई केदार, आरपीआयचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, अनिल म्हमाने आदी मान्यवरांच्या हस्ते मानाचा फेटा, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पुस्तके देऊन कलाकारांचा गौरव करण्यात आला.
या फेस्टिव्हलसाठी देशभरातून तब्बल ८६० हून अधिक शॉर्ट फिल्म्स प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी आशय, विषय आणि दर्जाच्या आधारे निवडलेल्या पहिल्या नामांकन यादीत ‘निसर्ग’ या लघुपटाने पहिल्या १५ मध्ये स्थान मिळवत सहाव्या क्रमांकाचे नामांकन पटकावले.
एस. के. जाधव हे शिक्षक म्हणून कार्यरत असतानाच क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आणि समाजप्रबोधनाची विशेष आवड जोपासत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी सामाजिक संदेश देणाऱ्या लघुपटांच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य सुरू केले आहे. तसेच ते उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणूनही परिचित आहेत.
