खेड : भारतीय जनता पार्टी खेड आणि आयुष होमिओपॅथी क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने खेड शहरातील प्रबोधनकार ठाकरे उद्यानात जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला चिपळूणची आंतरराष्ट्रीय योगपटू तथा वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सुवर्णपदक पटकावणारी तन्वी रेडीज प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित होती. तिच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण लाभले. यावेळी तन्वीने योगासनांचे प्रात्यक्षिक सादर करत उपस्थितांना योगाचे महत्त्व पटवून दिले.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना तन्वी रेडीज हिने सर्वांना जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि प्रत्येकाने दररोज किमान १२ मिनिटे तरी योगाचा सराव करावा, असे आवाहन केले. आपल्या यशाचा प्रवास उलगडताना ती म्हणाली की, दुसरीत असताना ती आपल्या बहिणीसोबत कथ्थक शिकण्यासाठी जात होती. मात्र कथ्थकमध्ये विशेष रुची नसल्याने आणि क्रीडा क्षेत्रात काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असल्याने तिने योगाची निवड केली. याबाबत तिने आपल्या आई-वडिलांशी चर्चा केली आणि त्यांनी दिलेल्या प्रोत्साहन व पाठबळामुळेच आज जागतिक स्तरावर भारतासाठी सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले. घरात योग क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवता आले, असे तिने सांगितले. आजच्या तरुणांनी कोणतेही क्षेत्र निवडले तरी त्यामध्ये कठोर परिश्रम, त्याग आणि समर्पणाची तयारी ठेवली पाहिजे, असा प्रेरणादायी संदेशही तिने दिला.