चिपळूण : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी मंत्री तथा आमदार सन्माननीय भास्करराव जाधव यांनी चिपळूण शहर व परिसरातील विविध सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना भेटी देऊन देवीचे दर्शन घेतले. भक्तिभाव, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक एकोपा यांचा संगम साधणाऱ्या या भेटीदरम्यान त्यांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकात्मता जपण्याचे आवाहन केले.

आमदार जाधव यांनी बाजारपेठ मित्र मंडळाच्या आई वाघजाई देवीचे, मार्कंडी येथील भैरी भवानी मित्र मंडळाच्या देवीचे, काविळतळी येथील ओंकार मित्र मंडळाच्या देवीचे आणि खेर्डी येथील मफतलाल मंडळाच्या देवीचे दर्शन घेतले. प्रत्येक मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

कोकणची संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश

यावेळी मनोगत व्यक्त करताना भास्करराव जाधव म्हणाले की, कोकणचा माणूस उत्सवप्रिय असून नवरात्रोत्सव श्रद्धा, नम्रता आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे. आकर्षक सजावट, रोषणाई, दांडिया रास आणि विविध सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे सार्वजनिक उत्सवांना विशेष महत्त्व प्राप्त होते. अशा उत्सवांमध्ये सहभागी होऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यात आनंद वाटतो.

रावणदहनाचा संदर्भ देताना त्यांनी स्पष्ट केले की, रावण म्हणजे केवळ व्यक्ती नव्हे, तर वाईट प्रवृत्ती आणि दुष्कर्मांचे प्रतीक आहे. या प्रवृत्तींचे दहन करून प्रत्येकाने सद्विचारांनी जीवन जगावे.

नवरात्रोत्सवात सहभागी होण्यासाठी आधार कार्डाची सक्ती करण्याच्या प्रकारावर भाष्य करताना ते म्हणाले, “उत्सवात आधार कार्डाची नव्हे, तर एकमेकांना आधार देण्याची गरज आहे. खरा आधार आपल्या वागण्यात, विचारांत आणि वृत्तीत असला पाहिजे. आपण एकमेकांचा आदर करून एकत्र राहिले पाहिजे. सार्वजनिक उत्सव यशस्वी करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.” अशा अनावश्यक सक्तीचे प्रकार टाळून सामाजिक सलोखा जपण्याचे आवाहनही त्यांनी केले.

पक्षीय संघटनात्मक बांधिलकी आणि जनसंपर्क

या देवीदर्शन दौऱ्याच्या माध्यमातून सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि पक्षाचे पदाधिकारी यांच्यात संवाद साधला गेला. धार्मिक श्रद्धेसोबतच स्थानिक पातळीवरील जनसंपर्क, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने या भेटींना महत्त्व प्राप्त झाले.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चिपळूण शहरप्रमुख सचिन (भैय्या) कदम, नगरपरिषद गटनेते व नगरसेवक मिथिलेश (विकी) नरळकर, नगरसेवक फैसल कास्कर, प्रतिष्ठित उद्योजक धनंजय (बाळा) आंबुर्ले, रोटरी अध्यक्ष शैलेश (दादा) टाकळे, युवासेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, शहर सचिव प्रशांत मुळ्ये, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे, समीर महाब्धी, युवा सेना उपतालुका अधिकारी राहुल भोसले, उपशहर अधिकारी ओंकार गायकवाड, उपविभाग अधिकारी आर्यन मिरगल, शिवसैनिक नरेंद्र (भाई) लिंगायत आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

भक्तिभाव, सामाजिक एकोपा आणि माणुसकीचा संदेश देणारा हा देवीदर्शन दौरा उत्साहात पार पडला. नवरात्रोत्सवाची परंपरा दरवर्षी अधिक वृद्धिंगत होवो, अशा शुभेच्छा आमदार भास्करराव जाधव यांनी यावेळी दिल्या.