मुंबई : महाराष्ट्रातील तरुण पिढीला बरबाद करणारे ड्रग्जचे विष आता मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांतच नव्हे, तर तालुक्यापर्यंत पोहोचले आहे. गुजरातच्या कांडला बंदरातून महाराष्ट्रापर्यंतच्या ड्रग्ज कॉरिडॉरमधून हे विष आपल्या राज्यात येत आहे. राजकीय आशीर्वादामुळेच ‘उडता पंजाब’प्रमाणे ‘डुबता महाराष्ट्र’ बनवण्याचे पाप महायुतीने केले आहे. महाराष्ट्राच्या तरुणाईला बरबाद करणाऱ्या महायुती सरकारला जनता कदापि माफ करणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे।

नाशिकच्या प्रकरणात जबरदस्तीने धर्मांतराचा मुद्दा चर्चिला जात आहे. याप्रकरणी एफआयआर सार्वजनिक करण्याची गरज आहे आणि सर्व प्रकरणांत कठोर कारवाई केली पाहिजे. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत बिकट बनली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देऊन राज्याला पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री द्यावा, अशी मागणीही हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे।