चिपळूण : रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूस, म्हणजेच शहराच्या दिशेने तिकीट खिडकी आणि कॅन्टीन उभारण्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीला प्रत्यक्ष मूर्त स्वरूप मिळत असल्याने रेल्वे प्रवासी आणि नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.चिपळूण रेल्वे स्थानकाच्या शहराकडील बाजूला तिकीट खिडकी आणि कॅन्टीनची सुविधा उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांच्यासह अनेक प्रवासी आणि नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता.
शहराकडून रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी फलाट क्रमांक १ वरील तिकीट खिडकीपर्यंत जावे लागत होते. त्यामुळे विशेषतः गाडी येण्याच्या वेळी प्रवाशांची मोठी धावपळ होत असे. अनेकदा तिकीट काढण्याच्या प्रक्रियेत वेळ गेल्याने प्रवाशांची गाडी चुकण्याचे प्रकारही घडत होते. तसेच या बाजूने प्रवास करणाऱ्या नागरिकांना कॅन्टीनची सुविधाही उपलब्ध नव्हती.अखेर या समस्येची दखल घेत शहराकडील बाजूला तिकीट खिडकी आणि कॅन्टीन उभारण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. त्यामुळे या भागातून रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना तिकीट काढणे आणि खाद्यपदार्थांची सुविधा मिळणे अधिक सोयीचे होणार आहे. याशिवाय या बाजूला पार्किंगची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे समजते.अनेक वर्षांपासून प्रवासी आणि नागरिकांच्या सोयीसाठी मांडण्यात येत असलेल्या मागणीला अखेर यश मिळत असल्याने शौकतभाई मुकादम यांनी समाधान व्यक्त केले आहे. प्रवाशांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन केलेल्या पाठपुराव्याला प्रत्यक्ष कामाच्या स्वरूपात यश मिळणे ही समाधानाची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.प्रवाशांच्या सोयीसाठी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळत असल्याने चिपळूण रेल्वे स्थानकाच्या शहराकडील बाजूच्या विकासाला आता नवी दिशा मिळणार आहे.
