खेड : – तालुक्यातील चोरवणे गावची जागृत ग्रामदेवता आदिमाया- आदिशक्ती श्रीरामवरदायिनी देवी नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. देवीच्या दर्शनासाठी मुंबई,पुणे, ठाणे तसेच रायगड,रत्नागिरी, सातारा,गुजरात आणि विविध गावांमधून,शहरामधून,परदेशामधून दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक भक्तगण येत असतात.देवीच्या मंदिरात नित्यनेमाने सकाळी व सायंकाळी आरती होत असते. यावर्षीचा श्री रामवरदायिनी देवीचा नवरात्र उत्सव रविवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ ते मंगळवार, दिनांक २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे.
नवरात्र उत्सवादरम्यान महाभिषेक विधिवत पूजा, महामंगल आरती, हरिपाठ,भजन तसेच गरबा (दांडिया रास) रूपी जागर अशा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.विशेष कार्यक्रम शुक्रवार १६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता महिला भजन मंडळ,तिसंगी ह.भ.प.सौ.स्नेहल नंदकिशोर भोसले यांचे भक्तिमय भजन आयोजित करण्यात आले आहे. शनिवार १७ ऑक्टोबर २०२६ रोजी शिवव्याख्याते कुमार आर्यन बबन मेस्त्री यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.त्यानंतर रात्री १०.०० वाजता शक्तीवाले शाहिर पूनम आगरकर आणि तुरेवाले शाहिर किशोर सणस यांचा “शक्ती-तुऱ्याचा जंगी सामना” हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.रविवार १८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता श्री.प्रकाश सकपाळ व सहकारी यांचा भक्तिमय “स्वराभिषेक” भक्तिसंगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मंगळवार दिनांक २० ऑक्टोबर २०२६ रोजी नवरात्र उत्सवाची सांगता महाभिषेक, विधिवत पूजा,महामंगल आरती आणि विजयादशमीच्या सीमोल्लंघनाने करण्यात येणार आहे.या पवित्र नवरात्र उत्सवात सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आई श्री. रामवरदायिनी देवीचे दर्शन आणि विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री रामवरदायिनी देवस्थान कमेटी आणि ग्रामविकास मंडळ मुंबई,पुणे आणि चोरवणे ग्रामस्थ यांनी केले आहे.दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.