दापोली : सायबर गुन्हेगारांनी स्वतःला बेंगळुरू पोलीस व सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून कृषी महाविद्यालय दापोली येथील एका निवृत्त प्राध्यापक यांना “डिजिटल अरेस्ट”ची भीती दाखवत तब्बल 1 कोटी 23 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार काही महिन्यापूर्वी उघडकीस आला होता.
दापोली पोलीस ठाणे व सायबर पोलीस ठाणे, रत्नागिरी येथे दाखल तक्रारीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना त्यांच्या कॅनरा बँक, माटुंगा (मुंबई) येथील खात्यातून 3 कोटी रुपयांचा फ्रॉड झाल्याचे सांगून घाबरविले. तसेच त्यांना डिजिटल अरेस्ट करण्यात आल्याचे भासवून 4 नोव्हेंबर 2025 ते 19 जानेवारी 2026 या कालावधीत वेळोवेळी पैशांची मागणी केली. या फसवणुकीत फिर्यादीकडून एकूण 1 कोटी ,23 रुपये उकळले होते.
या प्रकरणी सायबर पोलीस ठाणे, रत्नागिरी येथे गुन्हा क्र. 02/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 318(2), 318(4), 319(2), 3(5) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 च्या कलम 66(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे दिल्ली येथे कारवाई करून गगनदीप भारद्वाज (रा. नोएडा, दिल्ली) याला ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी स्मिता सुतार, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार जाधव व त्यांच्या पथकाने केली.
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पोलीस, सीबीआय किंवा अन्य सरकारी विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून कोणीही बँक खाते, सिमकार्ड किंवा आर्थिक व्यवहारांबाबत चौकशी करत असल्यास घाबरून जाऊ नये. वैयक्तिक अथवा बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नये आणि संशयास्पद कॉल आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 1.23 कोटींची फसवणूक; दिल्लीतील आरोपी अटकेत
