मुंबई : भोंदू अशोक खरात प्रकरणात आता नवे वळण आले असून, वंचित बहुजन आघाडीने अत्यंत गंभीर शंका व्यक्त केली आहे. पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये या प्रकरणातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पक्षाने म्हटले आहे की, आतापर्यंत समोर आलेली माहिती ही “हिमनगाचे टोक” असून, या प्रकरणात अनेक मोठ्या व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता आहे. काही मंत्री, त्यांचे कुटुंबीय, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि इतर प्रभावशाली व्यक्तींचे संभाषण रेकॉर्ड झाल्याची माहितीही ‘वंचित’ने दिली आहे.
वंचित बहुजन आघाडीने पुढे असा गंभीर दावा केला आहे की, अशोक खरात हा केवळ आरोपी नसून या संपूर्ण प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार देखील आहे. त्यामुळे त्याच्याकडून महत्त्वाची नावे समोर येऊ नयेत यासाठी त्याला कोठडीतच जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर अशोक खरात याला तात्काळ उच्च सुरक्षा कोठडीत ठेवण्यात यावे, अशी ठाम मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
दरम्यान, या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, प्रकरणातील पुढील तपास आणि संभाव्य मोठ्या घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
