रत्नागिरी : आंबा उत्पादक शेतकऱ्यांना डीसीएस ॲपद्वारे ई-पिक पाहणी करताना आंब्याच्या विविध जातींची स्वतंत्र नोंद करता यावी, यासाठी रत्नागिरीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी कृषी आयुक्तालयाकडे मागणी केली आहे.

याबाबत २९ सप्टेंबर २०२६ रोजी कृषी विभागाला पत्र पाठविण्यात आले आहे. सध्या डीसीएस ॲपमध्ये आंबा पिकाची नोंद करताना ‘Seed Variety’ हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, महाराष्ट्रातील, विशेषतः कोकणातील प्रमुख आंब्याच्या जाती स्वतंत्रपणे ॲपमध्ये उपलब्ध नसल्याने प्रत्यक्ष शेतातील आंबा पिकाची योग्य नोंद करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

कोकणातील आंबा उत्पादकांसाठी हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी यांसह महाराष्ट्रातील प्रमुख आंब्याच्या जातींचा डीसीएस ॲपमध्ये स्वतंत्रपणे समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच काजू, नारळ व सुपारी या फळपिकांच्या सर्व प्रमुख जातींचाही ॲपमध्ये समावेश करून ई-पिक पाहणी करताना आवश्यक पर्याय तातडीने उपलब्ध करून द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.

ॲपमध्ये विविध जातींची स्वतंत्र नोंद करण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष पीक नोंदी अधिक अचूकपणे करता येतील आणि ई-पिक पाहणीची प्रक्रिया अधिक परिणामकारक होण्यास मदत होईल, असे कृषी विभागाच्या पत्रातून स्पष्ट करण्यात आले आहे.