खेड : दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. दिशा सालियन ही महाराष्ट्राची मुलगी असून तिला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी कदम यांनी केली.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल झाल्याचा संदर्भ देत रामदास कदम यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. “एफआयआर दाखल झाला म्हणजे आदित्य ठाकरे दोषी आहेत, असा त्याचा अर्थ होत नाही. दोषी आहेत की नाही, हे तपासातून स्पष्ट झाले पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी कदम यांनी ठाकरे कुटुंबाच्या राजकीय प्रभावाचाही उल्लेख केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे कुटुंबाचे देशाच्या राजकारणात मोठे स्थान होते. मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीत हे स्थान कमी झाले आहे, असा दावा त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्याकडे पूर्वी ६० आमदार होते, आता त्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे “मोठं कोण आणि छोटं कोण, याचा आत्मपरीक्षण त्यांनी केला पाहिजे,” अशी टीकाही रामदास कदम यांनी केली. दिशा सालियन प्रकरणात राजकारण आणण्याचा आरोप फेटाळताना कदम म्हणाले की, हा विषय न्यायालयीन प्रक्रियेशी संबंधित आहे. “एका मुलीला न्याय मिळाला पाहिजे. ती महाराष्ट्राची मुलगी आहे. तिच्या मृत्यूमागील सत्य जनतेसमोर आले पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
या प्रकरणाची सीआयडीमार्फत आणखी सखोल चौकशी करून सत्य महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणावे, अशी मागणी रामदास कदम यांनी पुन्हा केली. तसेच या प्रकरणात नेमके काय घडले, हे स्पष्ट होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.