खेड (प्रतिनिधी) : – येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस. महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. राजेश राजम यांनी विकसित केलेल्या “क्लायमेट मॉनिटरिंग डिव्हाइस” या नाविन्यपूर्ण यंत्राच्या डिझाइनला नुकतेच पेटंट (डिझाइन नोंदणी) प्राप्त झाले आहे. पर्यावरणीय घटकांचे सातत्याने निरीक्षण करून आवश्यक सूचना देणारे हे यंत्र ग्रंथालये, संग्रहालये, अभिलेखागारे, शैक्षणिक संस्था, कार्यालये, औद्योगिक क्षेत्रे तसेच कृषी क्षेत्रासाठीही अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
सध्या हवामानातील बदल, वाढते तापमान, आर्द्रतेतील चढ-उतार, धूळ, धूर आणि प्रदूषण यांमुळे पुस्तके, दस्तऐवज आणि इतर मौल्यवान वस्तूंचे नुकसान होत असल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत हे उपकरण वातावरणातील विविध घटकांचे सातत्याने निरीक्षण करून त्यांची अचूक माहिती उपलब्ध करून देईल. यंत्रामध्ये तापमान, आर्द्रता, हवेची गुणवत्ता, धूळ, धूर आणि प्रकाशाची तीव्रता मोजणारे अत्याधुनिक सेन्सर्स वापरले जातील. प्राप्त माहितीची प्रक्रिया मायक्रोकंट्रोलरद्वारे करून ती डिस्प्लेवर दर्शविली जाईल तसेच इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईल ॲप किंवा क्लाउड सर्व्हरवर पाठविता येईल. या यंत्रामध्ये Internet of Things (I O T), कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence), सेन्सर तंत्रज्ञान, क्लाउड कॉम्प्युटिंग, डेटा अॅनालिटिक्स आणि RFID तंत्रज्ञान यांचा वापर करण्याची संकल्पना आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना कोणत्याही ठिकाणाहून संबंधित परिसरातील पर्यावरणीय स्थितीची माहिती मिळू शकते. तापमान किंवा आर्द्रता धोकादायक पातळीवर गेल्यास यंत्र तात्काळ अलर्ट देऊन संभाव्य नुकसान टाळण्यास मदत करेल. ग्रंथालय क्षेत्रात या उपकरणाचे विशेष महत्त्व आहे. ग्रंथालयातील पुस्तके, दुर्मीळ ग्रंथ, हस्तलिखिते आणि संदर्भ साहित्य यांचे जतन करण्यासाठी नियंत्रित वातावरण आवश्यक असते. जास्त आर्द्रतेमुळे बुरशी निर्माण होणे, धुळीमुळे पुस्तकांचे नुकसान होणे किंवा उष्णतेमुळे कागद खराब होणे अशा समस्या या यंत्राच्या मदतीने कमी करता येतील. तसेच RFID तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पुस्तकांच्या सुरक्षेसाठी आणि व्यवस्थापनासाठीही ही प्रणाली उपयुक्त ठरू शकते.