चिपळूण : देशभरात २३ सप्टेंबर हा दिवस ‘आयुर्वेद दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर घाणेखुंट-लोटे येथील एम इ एस आयुर्वेद महाविद्यालय व परशुराम रुग्णालय येथे १० सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या कालावधीत ११ वा आयुर्वेद दिवस विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. या दोन आठवड्यांच्या कार्यक्रमात आयुर्वेद आहार फेस्ट, रानभाज्या पाककला प्रदर्शन, घाणेखुंट व पीर लोटे या गावांमध्ये पथनाट्य व रॅली, पोस्टर प्रदर्शन, वनौषधी प्रदर्शन, आरोग्य शिबिरे आणि व्याख्यान इत्यादी विविध प्रकारच्या कार्यक्रमाचा समावेश होता.

आयुर्वेद आहार फेस्टच्या उद्घाटनाप्रसंगी श्री. विवेक कुलकर्णी (अमनोरा येस फाउंडेशन, पुणे) व प्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ वैद्य धनंजय कुलकर्णी (पुणे) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. रानभाज्या पाककला प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी डाऊ केमिकल्सचे पदाधिकारी तसेच इनरव्हील क्लब, चिपळूणचे पदाधिकारी आरोग्य शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते. 23 सप्टेंबर रोजी वैद्य अमेय भावे (कार्यवाह, रत्नागिरी जिल्हा आयुर्वेद व्यासपीठ) यांचे विशेष व्याख्यान झाले. या वेळी चिपळूण येथील वैद्य रत्नाकर थत्ते, वैद्य अतीन औताडे, वैद्य निमिष बापट हे मान्यवर उपस्थित होते.

महाविद्यालयाच्या आयुर्वेद दिवसाच्या यावर्षीच्या नोडल ऑफिसर वैद्या शैला शनवाडे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य वैद्य सचिन उत्पात व वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. अनुपम अलमान यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. या संपूर्ण कार्यक्रमात महाविद्यालयाचे अध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांचा उत्तम सहभाग राहिला. ग्रामीण भागातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपक्रमांचा लाभ घेतला. आयुर्वेद दिवस साजरा करण्यामागील उद्देश म्हणजे आयुर्वेदाचे महत्व समाजात रुजवणे, पारंपरिक ज्ञानाचे जतन करणे आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करणे हे आहे.