मंडणगड : फुगडी हा केवळ मनोरंजनाचा प्रकार नसून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीशी जोडलेला ऐतिहासिक महत्त्वाचा कला प्रकार आहे. मंगळागौरीच्या माध्यमातून महिलांनी पिढ्यान्‌पिढ्या या लोकपरंपरा जपल्या आहेत. बदलत्या काळातही या पारंपरिक कला नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आणि त्यांचे संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी केले.
मंडणगड शिवसेना महिला आघाडी व युवती सेना यांच्या वतीने नारी शक्तीचा जागर उपक्रमांतर्गत मंडणगड येथे श्रीकृष्ण हॉलमध्ये मंगळागौर या नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. तालुक्यातील विविध गावांमधील महिला मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांनी फुगडी, झिम्मा, फेर तसेच विविध पारंपरिक नृत्य व लोककला प्रकारांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी बोलताना अस्मिता केंद्रे म्हणाल्या, मंगळागौर हा महिलांच्या सांस्कृतिक सहभागाचा आणि आनंदाचा उत्सव आहे. या निमित्ताने महिला एकत्र येतात, आपल्या कलागुणांना वाव देतात आणि आपल्या पूर्वजांनी जपलेल्या परंपरांचे स्मरण करतात. ग्रामीण भागातील महिलांच्या या कला आणि परंपरांना व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. आजच्या आधुनिक जीवनशैलीत अनेक पारंपरिक कला मागे पडत आहेत. त्यामुळे फुगडी, झिम्मा, पारंपरिक नृत्य आणि लोककला यांचे जतन करण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने झाले पाहिजे. यातून केवळ मनोरंजन होत नाही, तर आपल्या संस्कृतीची मुळे पुढील पिढीशी जोडली जातात, असेही त्यांनी स्पष्ट केले. नारी शक्तीचा जागर या उपक्रमातून महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देतानाच त्यांच्या सामाजिक सहभागालाही चालना देण्याचा संदेश देण्यात आला. पारंपरिक गीते, फुगड्या आणि नृत्यप्रकारांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याने कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. मंगळागौरीच्या माध्यमातून मंडणगड तालुक्यातील समृद्ध लोकपरंपरा आणि ग्रामीण महिलांच्या कलागुणांचे दर्शन घडले. कार्यक्रमाला सभापती प्रणाली चिले, सदस्या दिप्ती घडशी, महिला संघटक अमिता शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
फोटो ओळी
मंगळागौर नारी शक्तीचा जागर या कार्यक्रमांत उद्घाटन प्रसंगी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे सोबत प्रणाली चिले, दिप्ती घडशी व अन्य.