अकोला : गॅस सिलेंडरच्या तीव्र तुटवड्यामुळे आज एक दुर्दैवी घटना घडली असून वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव सिरसाठ यांचा जीव गेला आहे. सकाळी सुमारे नऊ वाजल्यापासून गॅस मिळवण्यासाठी रांगेत उभे असलेल्या सिरसाठ यांना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास चक्कर आली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड . प्रकाश आंबेडकर यांनी शासनाच्या नियोजनशून्यतेवर कठोर टीका केली आहे. “गॅस सिलेंडरचा तुटवडा होणार असल्याची पूर्वसूचना देण्यात आली होती. तरीही शासनाने योग्य नियोजन केले नाही. योग्य वेळी उपाययोजना केल्या असत्या तर शंकरराव सिरसाठ यांचा जीव वाचला असता,” असे त्यांनी म्हटले.

यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत, “गॅस सिलेंडरसाठी लोकांचे जीव जाण्याची वेळ येऊ नये. यासाठी तात्काळ उपाययोजना करून पुढील काळात अशा घटना टाळण्यासाठी शासनाने दक्षता घ्यावी,” अशी मागणीही केली.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी गॅस पुरवठ्याबाबत तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे.