खेड : राज्य शासन आणि मुंबई विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काचा परतावा देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. खेड तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश असल्याने येथील आय.सी.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परतावा देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर. एस. भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी कृती समिती स्थापन करण्यात आली असून, शासन व विद्यापीठाच्या परिपत्रकातील तरतुदींनुसार विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परतावा देण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी व त्यांच्या पालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आर्थिक अडथळे निर्माण होऊ नयेत आणि त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या निर्णयामुळे पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
महाविद्यालयामार्फत परीक्षा शुल्क परताव्याची कार्यवाही सुरू असून, ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप या सुविधेचा लाभ घेतलेला नाही, अशा विद्यार्थ्यांनी श्री. वैभव नागे व श्री. समाधान शेठ यांच्याशी संपर्क साधून आवश्यक मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. अनिता आवटी यांनी केले आहे.
या उपक्रमामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना मदत मिळणार असून, शुल्क परताव्याच्या निर्णयाबद्दल विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.