खेड : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून सरस्वती शिक्षण संस्था (गुणदे, आवाशी, शेल्डी, माणी) संचलित सद्गुरू काडसिद्धेश्वर विद्यालय, गुरुकुल विद्यामंदिर तसेच अनुदत्त जनसेवा प्रतिष्ठान संचलित मातोश्री अनुसया (माई) आंब्रे स्मार्ट स्कूल (मम्मास), गुणदे येथे दांडिया नृत्य सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. नर्सरीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांच्या तालावर गरबा व दांडिया नृत्य सादर करत कार्यक्रमात रंगत आणली. पारंपरिक वेशभूषेतील चिमुकले या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कृष्णा अँटीऑक्सिडेंट्स प्रा. लि., लोटेचे जनरल मॅनेजर श्री. एस. एम. पाटील यांच्या हस्ते गणेशपूजन, त्यांचे सहकारी श्री. शुभम कदम यांच्या हस्ते सरस्वती पूजन, तर सरस्वती शिक्षण संस्थेच्या शाळा समिती व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. भास्करजी आंब्रे यांच्या हस्ते गुरुपूजन करण्यात आले. त्यानंतर सद्गुरू काडसिद्धेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. अश्विनी जोशी तसेच गुणदे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. अजित पाटील व त्यांच्या पत्नी सौ. पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी गणपती व दुर्गामातेची आरती करून वातावरण भक्तिमय केले.
सरस्वती शिक्षण संस्थेला सौरऊर्जा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भरीव मदत केल्याबद्दल कृष्णा अँटीऑक्सिडेंट्सचे जनरल मॅनेजर श्री. एस. एम. पाटील व त्यांचे सहकारी श्री. शुभम कदम यांचा संस्थेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गुणदे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. अजित पाटील यांचाही त्यांच्या पत्नीसमवेत शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. दांडिया सोहळ्यात विविध पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या बालकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. नर्सरीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत विविध गाण्यांच्या तालावर गरबा व दांडिया नृत्याचा आनंद लुटला. विद्यार्थ्यांच्या उत्साहामुळे संपूर्ण परिसरात नवरात्रोत्सवाचे आनंदमय वातावरण निर्माण झाले. यावेळी सरस्वती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री. विक्रांतजी आंब्रे, व्हाइस चेअरमन श्री. अरविंदजी आंब्रे, सचिव श्री. राजेंद्रजी आंब्रे, शाळा समिती व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. भास्करजी आंब्रे, संचालक श्री. विष्णुपंतजी आंब्रे, श्री. प्रकाशजी आंब्रे व इतर संचालकांनी विद्यार्थ्यांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला सद्गुरू काडसिद्धेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. अश्विनी जोशी, गुरुकुल विद्यामंदिरच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. अनिता विचारे, मम्मासच्या मुख्याध्यापिका सौ. पूर्वा माने, सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या आनंदी सहभागाने आणि उत्साही वातावरणात हा दांडिया नृत्य सोहळा संपन्न झाला.
सरस्वती शिक्षण संस्थेत रंगला दांडिया नृत्य सोहळा…!
