चिपळूण : जगबुडी खाडी, जि. रत्नागिरी येथे पारंपरिक पद्धतीने हातपाटी वाळू उत्खननास सन 2026-27 मध्ये परवानगी मिळावी, यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी ठोस पुढाकार घेतला आहे. माजी आमदार तथा सिंधुरत्न समितीचे सन्माननीय उपाध्यक्ष डॉ. विनयजी नातू यांनी महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास तथा संपर्क मंत्री मा. ना. श्री. नितेशजी राणे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करून या विषयाला चालना दिली आहे.
गेल्या वर्षी मिळालेल्या परवानगीची मुदत संपल्याने स्थानिक पारंपरिक वाळू व्यावसायिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदाही नियमानुसार हातपाटी वाळू उत्खननास परवानगी मिळावी, यासाठी भाजपकडून प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू आहे.
या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री. प्रशांतजी यादव, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री. सतीशजी मोरे तसेच भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री. लियाकतजी शाह यांनीही सातत्याने प्रयत्न केले आहेत. महाराष्ट्र सागरी मंडळाकडेही यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
दरम्यान, करंबवणे ते गोवळकोट खाडीतील हातपाटी वाळू गटांनाही परवानगी मिळावी, यासाठी संबंधित विभागाकडे मागणी करण्यात आली आहे. या परवानगीमुळे स्थानिक पारंपरिक वाळू व्यावसायिकांना रोजगार मिळण्यासोबतच चिपळूण शहर व परिसरातील नागरिकांना बांधकामासाठी वाळू उपलब्ध होऊन गैरसोय कमी होण्यास मदत होणार आहे.
स्थानिकांच्या हाताला रोजगार, पारंपरिक व्यवसायाला बळ आणि चिपळूणवासीयांना वाळूची उपलब्धता या उद्देशाने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला हा पाठपुरावा महत्त्वपूर्ण ठरत असून, त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून हातपाटी वाळू उत्खननास लवकरच परवानगी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
जगबुडी खाडीतील हातपाटी वाळू उत्खननासाठी भाजपचा पुढाकार…
