दापोली : दशानेमा गुजर युवक संस्था, दापोली आणि कुमार फ्रेंड्स सर्कल स्पोर्ट्स, पालगड यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कै. डॉ. मोहन महादेव गुजर स्मृती मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत पालगड येथील कुमार फ्रेंड्स सर्कल स्पोर्ट्सच्या ठिकाणी हे शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. पालगड व परिसरातील एकूण ७६ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
दापोलीतील दशानेमा गुजर समाजातील ज्येष्ठ, अनुभवी व जाणकार डॉक्टर म्हणून कै. डॉ. मोहन महादेव गुजर यांची विशेष ओळख होती. वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासोबतच त्यांचा राजकीय व सामाजिक कार्याचा वारसाही महत्त्वपूर्ण होता. त्यांच्या स्मृतींना उजाळा देत समाजोपयोगी उपक्रमातून त्यांना आदरांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. गतवर्षी फणसू प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या कै. डॉ. मोहन गुजर स्मृती मोफत आरोग्य तपासणी शिबिराला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर यंदा या उपक्रमाचे दुसरे वर्ष होते.
या शिबिरात दशानेमा गुजर युवक संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुणाल मेहता, डॉ. शेखर तलाठी, कै. डॉ. मोहन गुजर यांचे चिरंजीव डॉ. सचिन गुजर, डॉ. वरुण मोदी आणि डॉ. समर्थ पेंढारे यांनी रुग्णांची तपासणी करून वैद्यकीय सेवा बजावली. तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी व आवश्यक मार्गदर्शन मिळाल्याने परिसरातील नागरिकांना या शिबिराचा लाभ झाला.
शिबिरात तपासणी केलेल्या ज्या रुग्णांना सोनोग्राफीची आवश्यकता असेल, त्यांना डॉ. समीक्षा मेहता यांच्या निष्कर्ष सोनोग्राफी अँड डायग्नॉस्टिक सेंटर, दापोली येथे सोनोग्राफी तपासणीवर २० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवरील औषधांवर पालगड येथील कलावती मेडिकल स्टोअरमध्ये १० टक्के सवलत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सवलतींचा लाभ घेण्यासाठी संबंधित रुग्णांनी डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधांची चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन) सोबत आणणे आवश्यक आहे.
शिबिराच्या निमित्ताने दशानेमा गुजर युवक संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुणाल मेहता, उपाध्यक्ष निकेत मेहता, सदस्य सी.ए. ऋषिकेश शेठ तसेच कुमार फ्रेंड्स सर्कल स्पोर्ट्सचे अध्यक्ष अनंत बामणे यांनी मनोगत व्यक्त केले. कै. डॉ. मोहन गुजर यांचे चिरंजीव डॉ. सचिन गुजर आणि स्नुषा सुवर्णा गुजर यांचीही या वेळी उपस्थिती होती.
आपल्या मनोगतात डॉ. सचिन गुजर यांनी दशानेमा गुजर युवक संस्थेच्या कार्याचे विशेष कौतुक केले. गेल्या दोन वर्षांपासून संस्था विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असून, तरुणांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकीतून केलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘शून्य राजकारण आणि शंभर टक्के समाजकारण’ या ध्येयविचाराला केंद्रस्थानी ठेवून दशानेमा गुजर युवक संस्थेची सुरू असलेली वाटचाल अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
शिबिराच्या समारोपप्रसंगी विकास वेदक यांनी कुमार फ्रेंड्स सर्कल स्पोर्ट्स, पालगड यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. तर दशानेमा गुजर युवक संस्था गेल्या दीड ते दोन वर्षांच्या कालावधीत कोणकोणते उपक्रम राबवत आहे, याचा सविस्तर आढावा संस्थेचे सदस्य प्रा. तेजस मेहता यांनी घेतला.
या वेळी शिबिरासाठी वैद्यकीय सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टरांचा तसेच दशानेमा गुजर युवक संस्थेच्या पदाधिकारी व उपस्थित सदस्यांचा कुमार फ्रेंड्स सर्कल स्पोर्ट्स, पालगड यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार फ्रेंड्स सर्कल स्पोर्ट्सचे सदस्य डॉ. बिपीन शहा यांनी केले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी दशानेमा गुजर युवक संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुणाल मेहता, उपाध्यक्ष निकेत मेहता, कार्याध्यक्ष ऋषिकेश तलाठी, प्रकल्प समन्वयक सिद्धेश शेठ, तसेच संस्थेचे सदस्य सी.ए. ऋषिकेश शेठ, प्रा. तेजस मेहता, आदित्य गांधी, पार्थ साबळे, साहिल बुटाला, सार्थक बुटाला आणि इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
तसेच कुमार फ्रेंड्स सर्कल स्पोर्ट्स, पालगडचे अध्यक्ष अनंत बामणे, उपाध्यक्ष सिद्धेश गणवे, डॉ. बिपीन शहा, विकास वेदक, आदित्य मोरे, नवीन धारिया, दीपक वारे, विनायक जाधव, सूर्यकांत पवार, समीर कोचरे, आशिष काते, राजन पवार, संदेश मोरे आणि महादेव खोचरे यांनीही शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले. दोन्ही संस्थांच्या पदाधिकारी व सदस्यांनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांमुळे हे आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खेळीमेळीच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला. भविष्यातही दशानेमा गुजर युवक संस्था आणि कुमार फ्रेंड्स सर्कल स्पोर्ट्स, पालगड या दोन्ही संस्था एकत्रितपणे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणार असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी दोन्ही संस्थांनी संयुक्तपणे राबविलेला हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला.
