मुंबई : राहुल गांधींनंतर आता जनाब संजय राऊत माफीवीर होत सर्वोच्च न्यायालयाची नाक घासून माफी मागताहेत. माफी मागण्याची राहुल गांधींची परंपरा पुढे चालवताहेत. पण संजय राऊत यांनी केवळ सर्वोच्च न्यायालयाची माफी मागून चालणार नाही. जनतेची दिशाभूल करण्याचे आणि रोज उठून खोटे बोलायचे काम केले त्याबद्दल संजय राऊतांनी महाराष्ट्रातील 14 कोटी आणि देशातील 140 कोटी जनतेची नाक घासून माफी मागावी, असा हल्लाबोल भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला.
संजय राऊत, तुम्ही सर्वोच्च न्यायालयात न्याय मागता आहात. न्याय मागायचा असेल तर आणखी दोन-चार प्रकरणांबद्दलही मागा. पालघरमध्ये साधू हत्याकांड झाले, त्याबद्दल न्याय मागा. दिशा सालियानचा मृत्यू झाला. तिचे आई-वडील अद्याप न्यायालयात न्याय मागताहेत, त्याबद्दलही न्याय मागा. पत्राचाळीत शेकडो मराठी लोकांना बेघर केल्याबद्दलही सर्वोच्च न्यायालयात जाऊन न्याय मागितला पाहिजे. आमच्या पाटकर नावाच्या भगिनी गेल्या अनेक वर्षांपासून न्याय मागताहेत. मात्र त्यांना अद्याप न्याय मिळाला नाही. त्याबद्दलही न्याय मागा, असे आवाहन श्री. बन यांनी केले.
श्री. बन पुढे म्हणाले, 13 कोटी मतदार वगळले असे सांगत संजय राऊत आणि राहुल गांधी देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. हा आकडा धूळफेक करणारा आहे. 13 कोटींमध्ये जवळपास 10 कोटी हे दुबार मतदार, मृत आणि स्थलांतरित झालेल्यांचा समावेश आहे. उर्वरित केवळ 3 कोटींबद्दल संभ्रम आहे. ”एसआयआर” च्या प्रक्रियेत पात्र मतदार असतील, त्यांना फॉर्म 6 भरून हवे तेव्हा मतदार यादीत आपले नाव टाकता येते. परंतु राहुल गांधी, संजय राऊतांना बांगलादेशी घुसखोरांची, रोहिंग्यांची नावे मतदार यादीमध्ये हवीत. यांना दुबार-तिबार मतदारांची नावे हवीत. त्यामुळे यांचा ”एसआयआरला” विरोध आहे. नऊ खासदार निवडून आले, नऊही सोबत राहिले नाहीत. तुम्हाला खासदार, आमदार, कार्यकर्ते सांभाळता येत नाहीत आणि तुम्ही निवडणूक आयोगाला जबाबदार धरता? आधी आपल्या पक्षाची जुनी भांडी व्यवस्थित धुवा आणि मग निवडणूक आयोग, एसआयआरबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करा.
आज तिरंगा रॅलीचे आयोजन करणाऱ्या सीजेपी अर्थात काँग्रेस जिताओ पार्टीला माझा सवाल आहे, तुम्हाला या देशात बांगलादेशसारखी परिस्थिती आणायची आहे का? या देशात नेपाळसारखी जाळपोळ करायची आहे का? कारण काल प्रशांत भूषण यांनी ज्या पद्धतीने आम्हाला ‘रिजीम चेंज’ करायचेय, म्हणजेच सत्तापालट करायचा, असे सांगितले त्यावरून तुमचा मनसुबा स्पष्ट आहे. तुम्हाला संविधान, सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग नको आहे आणि जनतेने निवडून दिलेले सरकारही नको आहे. हातात तिरंगा घेऊन तुम्ही देशविरोधी भूमिका घेणार असाल, तर या देशातील नागरिक आणि सरकार हे सहन करणार नाहीत. तुम्हाला तिरंगा रॅली काढायची असेल तर निश्चित काढा; परंतु ती देश वाचवण्यासाठी असली पाहिजे, देश जाळण्यासाठी नाही हे सीजेपीने लक्षात ठेवावे, असे श्री. बन यांनी सुनावले.