मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा हा ‘सेवा संकल्प’ नसून ‘मेवा संकल्प अभियाना’चा शेवटचा अंक आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. दिल्ली ही राजकीय राजधानी असली तरी मुंबई आर्थिक राजधानी आहे; त्यामुळे महाराष्ट्रातून भाजपला जास्तीत जास्त कसा ‘मेवा’ लुटता येईल, याची कारस्थाने रचण्यासाठीच हा दोन दिवसांचा दौरा असल्याचा आरोप त्यांनी केला.

सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्र सध्या गंभीर दुष्काळाचा सामना करत असून शेतकरी संकटात आहे. अमित शहा यांना खरोखरच सेवा करायची असेल, तर त्यांनी राजकीय नाटक न करता शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई जाहीर करावी. तसेच उद्योगपतींना दिलेल्या जमिनी, त्यात झालेला भ्रष्टाचार, आगामी काळातील पैशांचे वाटप आणि कुंभमेळ्याच्या नावाखाली झालेल्या हजारो कोटींच्या खर्चाचा हिशोब घेण्यासाठीच हा दौरा आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

संघाचे ‘लिबरल’ रूप डुप्लिकेट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर निशाणा साधताना सपकाळ म्हणाले की, संघाचे ‘लिबरल’ (उदारवादी) रूप हे पूर्णपणे डुप्लिकेट आहे. संघ नेहमी आपली खरी ध्येय-धोरणे लपवतो. संविधानाला विरोध असलेला संघ आज संविधान स्वीकारल्याचे नाटक करतो, तर तिरंग्याला विरोध करणारा इतिहास असूनही आज तिरंगा स्वतःचा असल्याचा आव आणतो.

विदेशात वेगळी भाषा आणि देशात वेगळी भूमिका, असा भाजप-संघाचा दुटप्पीपणा सतत समोर आला आहे. एकीकडे संघ-भाजपची भूमिका मुस्लिमविरोधी असते, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी १० पेक्षा जास्त इस्लामिक देशांचे सर्वोच्च पुरस्कार स्वीकारतात; हा विरोधाभास मोदी आणि संघाने स्पष्ट करावा. तसेच संविधानाबाबतची भूमिका आणि मुस्लिम समाजाबद्दलचा दृष्टिकोन यावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी थेट स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही सपकाळ यांनी केली.