मुंबई : काळाचौकी महागणपती मंडळासमोर काल रात्री घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या आठ वर्षीय रागिणी घनश्याम यादव हिच्या वडिलांची तसेच ३३ वर्षीय सुजाता यांच्या पतीची केईएम रुग्णालयात जाऊन सांस्कृतिक कार्य मंत्री अँड. आशिष शेलार यांनी आज भेट घेऊन सांत्वन केले.

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या सुजाता यांचा मृतदेह त्यांच्या पतीला मूळ गावी घेऊन जाण्यासाठी आवश्यक त्या सर्व व्यवस्था करण्याचे निर्देश मुंबई महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला त्यांनी यावेळी दिले.

या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून, घटनेशी संबंधित सर्व पुरावे संकलित करून त्याआधारे पुढील आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

गणेशोत्सव हा श्रद्धा, उत्साह आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. मात्र उत्सवाच्या काळात नागरिकांची आणि भाविकांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता असली पाहिजे. प्रत्येक गणेश मंडळाने आपल्या परिसरातील सुरक्षिततेच्या नियमांचे आणि प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करणे अत्यंत आवश्यक आहे, असेही मंत्री शेलार यांनी सांगितले.

यासंदर्भात मुंबई पोलीस आणि महापालिका प्रशासनालाही आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवाच्या काळात गर्दीचे नियोजन, मंडप परिसरातील सुरक्षितता तसेच भाविकांच्या ये-जा व्यवस्थेबाबत मंडळांनी अधिक सजग आणि जबाबदार राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

मुंबईतील सर्व गणेश मंडळांना नम्र विनंती आहे की, उत्सवाचा आनंद आणि भक्तीची परंपरा कायम ठेवतानाच सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. त्याचप्रमाणे भाविकांनीही प्रशासन आणि गणेश मंडळांकडून करण्यात येणाऱ्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांना सहकार्य करावे, असे ते माध्यमांशी बोलताना सांगितले.

या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून, त्यांना आवश्यक ती प्रशासकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांना सूचना त्यांनी दिल्या आहेत