रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, दापोली, मंडणगड, गुहागर या चार तालुक्यांमध्ये खासदार सुनील तटकरे यांनी विकास कामांची शिफारशी केल्या होत्या व त्यानुसार प्रशासकीय मान्यता देखील मिळाली होती. मात्र अद्याप प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे त्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळवून देखील कामे सुरू झाली नाहीत त्यामुळे सुनील तटकरे यांनी दिशा समितीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात खासदार सुनील तटकरे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीचे आम्ही देखील सदस्य असतो. त्या नात्याने लोकशाहीमध्ये आम्हाला विकास कामांची शिफारसी करण्याचे अधिकार दिलेले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये रत्नागिरी रायगड लोकसभा मतदारसंघांमधील खेड, दापोली, मंडणगड, गुहागर या तालुक्यांमध्ये विकासाची कामे प्रस्तावित केली होती आणि त्या कामांच्या शिफारसी देखील करण्यात आल्या होत्या. कामे मंजूर देखील झाली होती मात्र जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने ती कामे पूर्ण करण्यात आली नाहीत. त्यामुळे आज संपन्न झालेल्या दिशा समितीच्या मीटिंगमध्ये मी स्वतः जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी जिल्हा परिषद यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त करत मी शिफारस केलेल्या कामांची प्रशासकीय मान्यता झाली आहे ती सर्वच्या सर्व कामे सुरू झाली पाहिजेत अशा प्रकारच्या सूचना दिल्या. माझ्या कामाना मान्यता दिली म्हणजे प्रशासनाने माझ्यावर काही मेहेरबानी केलेली नाही. लोकशाहीने दिलेल्या मला तो अधिकार आहे. अशी प्रतिक्रिया खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.