रत्नागिरी : चिपळूण परिसरात गेल्या काही दिवसांत महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर ‘लाचलुचपत प्रतिबंधक विभागा’ने (ACB) केलेल्या धडक कारवायांवरून परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट होते. हा केवळ एखाद्या भ्रष्ट अधिकाऱ्याचा वैयक्तिक प्रश्न आहे की, या भ्रष्टाचाराला वरिष्ठ प्रशासकीय आणि राजकीय वरदहस्त लाभला आहे? असा गंभीर प्रश्न आज सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.

सामान्य माणसाची शासकीय कामे अडवून त्यांची पिळवणूक केली जात असेल आणि प्रत्येक कामासाठी लाच उकळली जात असेल, तर याची जबाबदारी सरकार आणि प्रशासन स्वीकारणार आहे की नाही?
भ्रष्टाचारमुक्तीच्या मोठमोठ्या बाता मारणाऱ्या भाजप सरकारने आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. कागदावर भ्रष्टाचार कमी झाल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात नागरिकांच्या अनुभवात मात्र तो प्रचंड वाढला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) ज्या धडाडीने कारवाया करत आहे, त्याबद्दल नागरिकांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! परंतु, केवळ एक-दोन कारवायांवर न थांबता एसीबीने चिपळूण शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांवर कडक नजर ठेवावी, ही आमची ठाम मागणी आहे.

भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणारा कोणताही घटक असो—त्याची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे आणि जनतेला याचे उत्तर मिळालेच पाहिजे, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची आहे.