खेड : येथील बसस्थानकाच्या आवारात खड्डा असून, या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून डबके निर्माण झाले आहे. याची दखल स्थानकप्रमुखांनी घेऊन खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा मार्ग मोकळा करून पाण्याचा निचरा झटपट होईल, याची नोंद घ्यावी, अशी अपेक्षा प्रवासी जनतेतून व्यक्त होत आहे.
या बसस्थानकाच्या डाव्या बाजूला खड्डा असून, त्यामध्ये पाणी साचून डबके निर्माण झाले आहे. डबक्यात साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होण्यास मदत होत असून, त्यामध्ये डेंग्यूच्या डासांचीही पैदास होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डेंग्यूच्या डासांमुळे मलेरियाला आमंत्रण मिळण्याची शक्यता आहे.
याची गंभीर दखल घेऊन खड्ड्यातील दूषित पाण्याचा तात्काळ निचरा करावा. तसेच, ‘स्वच्छ खेड बसस्थानक, सुंदर बसस्थानक’ ही संकल्पना सत्यात उतरावी, अशी मागणी प्रवासी जनतेतून होत आहे.
