खोपोली : नगरपालिका हद्दीतील हाळ बुद्रुक गावात आज पहाटे एक थरारक घटना घडली. येथील रहिवासी अमजद सोंडे हे आपल्या घरालगत गावठी कोंबड्या आणि बकऱ्या पाळतात. पहाटेच्या सुमारास त्यांना कोंबड्यांच्या खुराड्यात काहीतरी संशयास्पद हालचाल जाणवली.

जवळ जाऊन पाहिले असता अंदाजे सहा फुटी अजगर कोंबड्यांवर हल्ला करण्याच्या तयारीत दबा धरून बसलेला दिसून आला. ही बाब लक्षात येताच अमजद सोंडे यांनी तत्काळ हेल्प फाउंडेशनचे सर्पमित्र अमोल ठकेकर यांच्याशी संपर्क साधला. या घटनेची माहिती मिळताच अमोल ठकेकर आणि गुरुनाथ साठेलकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अत्यंत कौशल्याने आणि कोणतीही हानी न करता त्यांनी त्या अजगराला सुरक्षितरीत्या जेरबंद केले.