मुंबई : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने देशभरात पक्षसंघटना बांधणीवर भर देत ‘संघटन सृजन अभियान’ हाती घेतले असून, या अभियानातून जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. याच अभियानाच्या धर्तीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यात ब्लॉक अध्यक्ष नियुक्तीची प्रक्रिया राबविली आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी निरीक्षकांची नियुक्ती करून स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करत ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबविण्यात आली आहे.

राज्यात काँग्रेस पक्ष मजबूत करणे, तसेच काँग्रेसचा विचार तळागाळात आणि गावपातळीपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी संघटनाबांधणीवर भर देण्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा मानस आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात काँग्रेसचा विचार अधिक प्रभावीपणे रुजविण्याचे महत्त्वाचे काम हे नवनियुक्त ब्लॉक अध्यक्ष करतील. देशाची लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी राहुल गांधी करत असलेला संघर्ष अधिक बळकट करण्यासाठी हे नवे शिलेदार सर्वशक्तीनिशी व एकजुटीने उभे राहतील, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला असून, सर्व नवनियुक्त ब्लॉक अध्यक्षांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.