लांजा : तालुक्यातील मौजे साटवली येथे काही व्यक्तींनी शेतकऱ्यांच्या हापूस आंबा बागेकडे जाणाऱ्या पारंपरिक मुख्य शेतरस्त्यावर जेसीबीच्या साहाय्याने माती आणि मोठे दगड टाकून हा मार्ग पूर्णपणे बंद केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुख्य रस्त्यावरून बागेकडे जाणाऱ्या फाट्यावरच अडथळा निर्माण केल्यामुळे बागांपर्यंत जाणे, तसेच पाणी, खते, औषध फवारणीचे साहित्य आणि शेतीमाल वाहून नेणारी चारचाकी व जड वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

पारंपरिक जोड रस्त्याचे महत्त्व:
हा पारंपरिक पानंद रस्ता साटवली मुख्य मार्गावरून निघून रुण अपकरेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेला जोडला जातो. साटवली व रुण परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या नियमित येण्या-जाण्यासाठी हा पूर्वांपार चालत आलेला अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे.

खंडणीसदृश वसुलीचा गंभीर आरोप:
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आंब्याचा हंगाम सुरू झाला की रस्ता बंद करायचा (वय घालायची), शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी करायची आणि पैसे मिळाल्यावर रस्ता खुला करायचा, असा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप बाधित शेतकऱ्यांनी केला आहे. हंगाम संपला की पुन्हा रस्ता अडवून पुढील हंगामात पैसे उकळले जातात. या आर्थिक व मानसिक पिळवणुकीमुळे परिसरातील शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत.

वैद्यकीय आणीबाणीत रुग्णाला हलवणेही बनले जीवघेणे:
सध्या हापूस आंब्याचा महत्त्वाचा हंगाम सुरू असून बागांची निगा राखणे आवश्यक आहे; परंतु रस्ता बंद असल्याने सर्व कामे खोळंबली आहेत. नुकतेच बागेत काम करताना एका कामगाराचा पाय ग्रास कटरने कापला गेला होता. रस्ता बंद असल्यामुळे या जखमी कामगाराला उपचारासाठी मुख्य रस्त्यापर्यंत आणि तेथून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेणे अत्यंत जिकिरीचे व जीवघेणे ठरले होते. सुदैवाने जीवितहानी टळली असली, तरी या मनमानी कारभारामुळे कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शासकीय नियमांची पायमल्ली:
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या २२ मे २०२५ च्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना आधुनिक शेती व वाहतुकीसाठी ३ ते ४ मीटर रुंदीचा शेतरस्ता उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम १४३ व मामलेदार कोर्ट अधिनियम १९०६ चे कलम ५ नुसार अर्ज प्राप्त झाल्यावर १० दिवसांत आदेश देणे बंधनकारक असतानाही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही.

प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल:
रस्त्याची अडवणूक करून खंडणीसदृश वसुली करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि रस्ता तात्काळ खुला करून द्यावा, या मागणीसाठी बाधित शेतकऱ्यांनी मा. जिल्हाधिकारी (रत्नागिरी), मा. प्रांताधिकारी (राजापूर विभाग), मा. तहसीलदार (लांजा) आणि मा. पोलीस निरीक्षक (लांजा पोलीस ठाणे) यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. प्रशासन या मुजोरी करणाऱ्यांवर काय कारवाई करते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.