लोटे :- खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहती मधील सीईटीपी परिसरात लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीचा रासायनिक सांडपाण्याने भरलेला टँकर येथील राजेंद्र आंब्रे, रवी गोवळकर, सचिन चाळके, गंगाराम चाळके, नितीन कडू, अजय चाळके, संजय चाळके, रोशन कालेलकर, सचिन काते, अंकुश चाळके, नंदू काते, अक्षय दिवेकर, संकेत हुमणे आणि इतर स्थानिक ग्रामस्थांनी पकडला असून, त्यामध्ये PFAS (Per- and Polyfluoroalkyl Substances) या घातक रसायनाचा रेसिड्यू असल्याचा संशय आहे.

हे रासायनिक सांडपाणी औद्योगिक वसाहती मधील सामुदायिक सांडपाणी प्रकल्पामध्ये नेण्यात आले होते. मात्र या प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने हे सांडपाणी त्याची योग्य ती तपासणी केल्यानंतर प्रकल्पामध्ये घेण्यासाठी नकार दिला. ग्रामस्थांनी टँकर पकडल्यानंतर सुद्धा पोलीस प्रशासन तेथे हजर असूनही कोणत्याही प्रकारचा पंचनामा केला गेला नाही. आणि म्हणूनच आंदोलक आणि ग्रामस्थांनी खाकीच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यामुळे संबंधित सर्व यंत्रणांनी त्या टँकरवर आणि लक्ष्मी ऑरगॅनिक च्या व्यवस्थापनावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीच्या वतीने माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केली आहे.
PFAS हे मानवी आरोग्य व पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक केमिकल असून, त्याच्या सुरक्षित विल्हेवाटीबाबत कंपनीकडून करण्यात आलेले दावे संशयास्पद ठरले आहेत. यापूर्वीही ग्रामपंचायतींनी CETP मध्ये रेसिड्यू सोडण्यास नकार दिलेला असताना, आज प्रत्यक्ष टँकर पकडल्याने हा प्रकार अधिक गंभीर झाला आहे. तसेच, टँकर पकडूनही अद्याप पंचनामा न झाल्याने प्रशासनाच्या भुमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप या प्रसिद्दीपत्रकाद्वारे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केला आहे.
या प्रकरणात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून टँकर जप्त करून नमुना तपासणी व पर्यावरण कायद्यांतर्गत कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांकडून पंचनामा व प्रशासकीय कारवाई, पोलिसांकडून भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करावा, तसेच RTO, महसूल विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आवश्यक ती दंडात्मक कारवाई होऊ शकते. पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६, घातक रासायनिक घनकचरा अधिनियम २०१६ आणि BNS २०२३ अंतर्गत या प्रकरणात कठोर कारवाईची तरतूद असल्याचेही दलवाई यांनी निदर्शनास आणले आहे.
या प्रकरणी हुसेन दलवाई यांनी मोबाईलद्वारे अनेकांशी संपर्क साधून माहिती घेतली तसेच या पकडलेल्या टँकरचा तत्काळ पंचनामा करून नमुना तपासणी करावी, PFAS उत्पादन व कचरा व्यवस्थापनाची सखोल चौकशी करावी, संबंधित सर्व विभागांनी संयुक्तपणे तातडीची कारवाई करावी, तसेच PFAS सारख्या घातक रसायनांवर स्पष्ट व कठोर धोरण तयार करावे आणि दोषींवर कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाई करावी, अशी ठोस मागणी कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.