संगमेश्वर : तालुक्यातील हरपुडे येथील आगरेवाडीमध्ये पाखाडी गणेश घाट येथे उभारण्यात आलेल्या निवारा शेडचे उद्घाटन नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या विकासकामासाठी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार शेखरजी निकम यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला.
गणेशोत्सवाच्या काळात गणपती विसर्जनासाठी या घाटावर मोठ्या संख्येने ग्रामस्थ येत असतात. विसर्जनाच्या वेळी नागरिकांना ऊन-पावसापासून संरक्षण मिळावे, तसेच गणेशभक्तांना थांबण्यासाठी सुरक्षित निवारा उपलब्ध व्हावा, या दृष्टीने उभारण्यात आलेले हे शेड ग्रामस्थांसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्याचबरोबर वर्षभर घाट परिसरात येणाऱ्या नागरिकांनाही या निवारा शेडचा लाभ मिळणार आहे.
गावाच्या गरजा ओळखून लोकांच्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष उपयोगी पडणारी विकासकामे मार्गी लावली जात असल्याने आगरेवाडी ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गणरायाच्या विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना चांगली सुविधा मिळावी, या भावनेतून साकारलेले हे काम ग्रामस्थांसाठी जिव्हाळ्याचे ठरले आहे.
यावेळी गाव अध्यक्ष पद्माकर कदम, आगरेवाडी अध्यक्ष राजाराम आग्रे, गावकरी मनोहर आग्रे, महिला अध्यक्ष तसेच आगरेवाडीतील मोठ्या संख्येने महिलावर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत सदस्य राजा भेरे, मनोज घुग, काशिनाथ घुग, काशीराम भेरे, शरद गायकवाड, ओंकार गायकवाड, नितीन भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या विकासकामासाठी जागा उपलब्ध करून देणारे दिलीप आग्रे यांचेही ग्रामस्थांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.
गणरायाच्या विसर्जनावेळी भक्तांना निवारा आणि ग्रामस्थांना सुविधा मिळावी, या छोट्याशा गरजेचे रूपांतर एका उपयोगी विकासकामात झाले आहे. त्यामुळे आगरेवाडीच्या विकासाच्या वाटचालीत या निवारा शेडची एक सकारात्मक भर पडली आहे.
