खेड : शहरात गणेशोत्सवाची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात झाली. खेड नगरपरिषद हद्दीत १७ सार्वजनिक मंडळांच्या तसेच १,५३० घरगुती गणपतींचे विविध विसर्जन घाटांवर भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.
शहरातील प्रमुख जगबुडी नदी वरील चिपळूण नाका येथील विसर्जन घाट, नारंगी नदीवरील व सुसेरी गणेश घाट तसेच महाडनाका येथील मेहबूब महाडिक विसर्जन घाटावर गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात भाविकांनी गणरायाला निरोप दिला.
विसर्जनाच्या ठिकाणी खेड नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान तैनात होते. विसर्जन कट्टा सदस्यांनीही भाविकांना गणपती विसर्जनासाठी आवश्यक मदत केली. घाटांवर स्वच्छता व सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्यात आली. दरम्यान, खेड शिवसेनेचा ‘महाराजा’ तसेच भाजपच्या गणपतीचेही मोठ्या थाटामाटात विसर्जन करण्यात आले. या विसर्जन मिरवणुकांमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते व भाविक सहभागी झाले होते.
पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विसर्जन मार्ग व घाटांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.