श्रीवर्धन : दिवेआगर समुद्रकिनारी विसर्जन पॉईंटजवळ पोहण्यासाठी गेलेले तीन पर्यटक समुद्राच्या मोठ्या लाटांचा आणि पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडाल्याची घटना आज, ५ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र, ऑन-ड्यूटी होमगार्ड आणि स्थानिक ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामधून या तिन्ही पर्यटकांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य संदीप भिसे (वय २४), अभिषेक साळवे (वय २३), भूमी बोऱ्हाडे (वय २१), शबिल शेख, अभिषेक जॉर्ज आणि तन्वी जगताप हे पर्यटनासाठी दिवेआगर येथे आले होते. आज दुपारी हे सर्वजण विसर्जन पॉईंट येथे समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते. यावेळी अचानक आलेल्या मोठ्या लाटा आणि पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अभिषेक साळवे, भूमी बोऱ्हाडे आणि आदित्य भिसे हे तिघे पाण्यात बुडू लागले.
​पर्यटकांनी मदतीसाठी मारलेली हाक ऐकून पोर्ट केबिन येथे कर्तव्यावर असलेले होमगार्ड (सनद क्रमांक ५११५) रेवाळे तसेच गोविंदा मिरवणुकीतील स्थानिक ग्रामस्थ प्रणय चोगले, विघ्नेश चोगले, योगेश चोगले आणि विष्णुदास चोगले यांनी तात्काळ धाव घेतली. त्यांनी जेट स्कीच्या मदतीने समुद्रात जाऊन बुडणाऱ्या तिन्ही पर्यटकांना सुरक्षितपणे पाण्याच्या बाहेर काढले.
​नाकात आणि तोंडात पाणी गेल्यामुळे या तिघांनाही तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, बोर्ली पंचतन येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले असून सध्या तिन्ही पर्यटकांची प्रकृती स्थिर आहे.
​स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा, होमगार्ड आणि दिवेआगरच्या ग्रामस्थांनी दाखवलेल्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.