मुंबई : राहुल गांधी यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग बंद करण्याची मागणी केली असून, संजय राऊत यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग बरखास्त केला पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यांवर भाजपचे महाराष्ट्र प्रवक्ते अजित चव्हाण यांनी जोरदार टीका केली आहे.
काँग्रेसच्या गांधी परिवाराची सत्ता असताना काही वर्षे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कामकाज घोटाळ्यांमुळे बंद होते. त्यावेळी पदाधिकारी तुरुंगात गेले होते, हे राहुल गांधी सोयीस्कररीत्या विसरले आहेत, असा आरोप अजित चव्हाण यांनी केला.

काँग्रेसच्या काळात काही वर्षांनंतर पेपरफुटीच्या घटना समोर येत होत्या. त्यावेळी दबाव आणून काँग्रेसी मालामाल होत होते, असा आरोपही त्यांनी केला. मोदी सरकारने कायदे करून पेपरफुटी करणाऱ्यांना आयुष्यभराची अद्दल घडेल, अशी व्यवस्था केली असून, या स्वायत्त संस्थांना बळकटी देण्याचा प्रयत्न केला आहे, असे चव्हाण म्हणाले.

दुसरीकडे, राहुल गांधी आणि संजय राऊत हे केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग बरखास्त करण्याची मागणी करत असताना, या दोन्ही स्वायत्त व घटनात्मक संस्था आहेत, हे ते विसरले आहेत, अशी टीका अजित चव्हाण यांनी केली.

आपल्याला सत्ता मिळावी यासाठी तरुणाईला अराजकतेकडे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘हेच ते दिमागी नक्षली’, अशी टीकाही अजित चव्हाण यांनी केली.