लांजा : रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार यंदा लांजा तालुक्यातील भांबेड येथील महाविद्यालयाचे मुख्याध्यापक ईलाही चाँदसाहेब मुलाणी यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत लांजा तालुक्यातील भांबेड येथील प्रतापराव माने विद्यालय आणि सुमित्रा देसाई कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक ईलाही चाँदसाहेब मुलाणी यांची जिल्हास्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यानिमित्ताने पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. यावेळी त्यांच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या उपक्रमांमुळे संस्थेचा शैक्षणिक दर्जा उंचावला असल्याचे गौरवोद्गार देखील काढण्यात आले.
हा पुरस्कार वितरण समारंभ शनिवार २५ एप्रिल रोजी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीच्या रत्नागिरी कार्यालयात पार पडला. याप्रसंगी कोल्हापूर जिल्ह्याचे सहाय्यक शिक्षण उपसंचालक गणपती कमळकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन मुलाणी यांना सन्मानित करण्यात आले.
दरम्यान, या पुरस्कार वितरण समारंभास उद्योजक अण्णा सामंत, शिवसेना जिल्हाध्यक्ष राहुल पंडीत, रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अय्युब मुल्ला, उपाध्यक्ष संजय चव्हाण, सचिव महेश पाटकर तसेच इतर पदाधिकारी व शिक्षकवृंद उपस्थित होते.
