चिपळूण : ज्ञान, मूल्य आणि उत्कृष्टतेची १०० वर्षे पूर्ण करणाऱ्या चिपळूण तालुक्यातील वाघिवरे येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेचा शताब्दी महोत्सव उद्या, मंगळवार दि. २८ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. वाघिवरे एक्स-स्टुडंट्स असोसिएशतर्फे या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी 9 वाजल्यापासून शाळेच्या मैदानावर कार्यक्रमास सुरुवात होणार असून मुफ्ती रफिक पुरकर साहेब यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम, मान्यवरांची भाषणे आणि माजी विद्यार्थ्यांचा सत्कार असा भरगच्च कार्यक्रम होणार आहे.

‘गौरवशाली १०० वर्षे’ –
1926 साली स्थापन झालेल्या या शाळेने 2026 पर्यंतचा 100 वर्षांचा दैदिप्यमान प्रवास पूर्ण केला आहे. ‘Knowledge • Values • Excellence’ हे ब्रीदवाक्य घेऊन शाळेने हजारो विद्यार्थी घडवले. या शताब्दी निमित्त माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत हा सोहळा आयोजित केला आहे.

दिग्गजांची मांदियाळी –
या महोत्सवाला उद्योग मंत्री उदय सामंत, गृहराज्य मंत्री योगेश कदम, गुहागरचे आमदार भास्करराव जाधव, चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्यासह माजी आमदार बाळाराम पाटील, सदानंद चव्हाण, डॉ. विनय नातू तसेच उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे, शिक्षणाधिकारी निलिमा नाईक, किरण लोहार, गटशिक्षणाधिकारी दादासाहेब इर्नाक ,हाजवाणी फाऊंडेशनचे अध्यक्ष बशीर हाजवानी, कोकण बँकेचे उपाध्यक्ष असगर मोहम्मद दबिर, चिपळूण मुस्लिम समाजाचे अध्यक्ष नाझिम अफवारे, माजी सभापती सिकंदर जसनाईक* यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार –
WESA या माजी विद्यार्थी संघटनेने या महोत्सवाची सर्व जबाबदारी घेतली आहे. शाळेच्या शताब्दी वर्षानिमित्त गावात उत्साहाचे वातावरण असून उद्याच्या सोहळ्यासाठी जय्यत तयारी पूर्ण झाली आहे तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.