चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय, चिपळूणच्या कार्यकारिणी सदस्यांनी नुकतीच विभा अरविंद ग्रंथालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी विभा अरविंद ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री. बापूसाहेब काणे व उपाध्यक्षा डॉ. सौ. वैशाली जाधव यांनी त्यांचे स्वागत केले.
भेटीदरम्यान कार्यकारिणी सदस्यांनी ग्रंथालयाची सविस्तर पाहणी केली. कथासंग्रह, कादंबऱ्या, शैक्षणिक, धार्मिक तसेच विविध विषयांवरील ग्रंथांचे वर्गीकरण करून ग्रंथालयाची शिस्तबद्ध मांडणी करण्यात आली आहे. ग्रंथांचे वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन, वाचकांना पुस्तके सहज उपलब्ध व्हावीत यासाठी आवश्यक असलेली सुसूत्र व्यवस्था आणि ग्रंथालय व्यवस्थापनातील आदर्श पद्धती यांचा त्यांनी आढावा घेतला. तसेच ग्रंथालयाच्या सेवाभावी उपक्रमांचे कौतुक करत हे संपूर्ण कार्य सेवाभावी वृत्तीने सुमारे तीनतासात पाडल्याबद्दल त्यांनी प्रशंसा व्यक्त केली.
यावेळी बोलताना लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे कार्यवाह श्री. धनंजय चितळे म्हणाले, “लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय हे चिपळूण तालुका ग्रंथालय असून तालुक्यातील सर्व ग्रंथालयांना मदत करत असते. विभा ग्रंथालय अथवा डॉ. बाबासाहेब ग्रंथालय असो, आम्ही एकदिलाने वाचन चळवळ वाढविण्यासाठी काम करत आहोत.”
या मताला दुजोरा देत कार्याध्यक्ष श्री. अरुण इंगवले यांनी, “यापुढेही असेच सहकार्य करून एकदिलाने शहरातील साहित्य व सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी होऊया,” असे आवाहन केले.
यावेळी लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे कार्याध्यक्ष श्री. अरुण इंगवले, उपाध्यक्ष श्री. सुनील खेडकर, कार्यवाह श्री. धनंजय चितळे, कोषाध्यक्ष श्री. सुबोध दीक्षित, सहकार्यवाह श्री. विनायक ओक, सदस्य श्री. अभिजीत देशमाने, सौ. मानसी पटवर्धन, श्रीमती मनीषा दामले, श्री. राम दांडेकर, ग्रंथपाल सौ. गौरी भोसले, सहग्रंथपाल श्री. संदीप जाधव व कु. सुजाता गुढेकर उपस्थित होते.
तसेच विभा अरविंद ग्रंथालयाचे कार्यवाह श्री. विजय कदम, कोषाध्यक्ष श्री. विनायक ओक, सदस्य श्री. प्रसाद रिसबूड, प्रा. विकास मेहेंदळे, डॉ. सौ. राजश्री सोमण, सौ. मेधा बेटकर, श्री. प्रकाश गांगण, श्री. सुहास चव्हाण तसेच कार्यकर्ते श्री. सुमित सागवेकर, श्री. सिताराम पडते, सौ. मुग्धा मोरे, ग्रंथपाल कु. सुप्रिया खोत, कु. निती चिपळूणकर, कु. पूर्वा कांबळे, श्री. सचिन पोकळे आदी उपस्थित होते.
यावेळी लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. यतिन जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत करून या सेवासंधीबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभारही व्यक्त केले. या अभूतपूर्व सदिच्छा भेटीमुळे दोन्ही वाचनालयांतील स्नेहसंबंध अधिक दृढ होण्याबरोबरच ग्रंथालय व्यवस्थापनाबाबत परस्पर अनुभवांची देवाणघेवाण होऊन भविष्यात संयुक्त उपक्रम राबविण्यास चालना मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांची नूतन विभा अरविंद ग्रंथालयाला सदिच्छा भेट
