मुंबई : डॉ. दीपक पवार यांचा आंदोलनाला जाहीर पाठिंबा; ‘MPSC जागर’ भजनातून शासन व आयोगाला जाग आणण्याचा प्रयत्न; उद्या अंजली दमानिया व तुषार गांधी आंदोलनस्थळी .महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) आगामी स्पर्धा परीक्षा संगणकाधारित (CBT) पद्धतीने घेण्याचा तसेच Normalization लागू करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करून सर्व परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाइन (OMR) पद्धतीने घेण्यात याव्यात, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने MPSC मुख्यालय, CBD बेलापूर, नवी मुंबई येथे सुरू असलेल्या साखळी उपोषण व धरणे आंदोलनाच्या आज सहाव्या दिवशी आंदोलनाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष मा. रामचंद्र (आबा) दळवी आणि प्रदेश सरचिटणीस धनंजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून, राज्यभरातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी, युवक, पालक आणि विविध सामाजिक संघटनांचा या आंदोलनाला दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत आहे.
आंदोलनाच्या सहाव्या दिवशी प्रख्यात अभ्यासक, लेखक आणि मराठी अभ्यास केंद्राचे डॉ. दीपक पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या न्याय्य लढ्याला जाहीर पाठिंबा दिला. त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी सविस्तर संवाद साधत सार्वजनिक भरती प्रक्रिया ही पारदर्शक, विश्वासार्ह आणि समान संधी देणारी असणे ही लोकशाहीची मूलभूत गरज असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आणि राज्य शासनाने तातडीने संवाद साधून योग्य निर्णय घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी CBT परीक्षा पद्धती, Normalization, तांत्रिक त्रुटी, सर्व्हर समस्या, डिजिटल असमानता, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव, तसेच अलीकडील भरती प्रक्रियांबाबत निर्माण झालेल्या शंका आणि न्यायालयीन निरीक्षणांची माहिती त्यांच्यासमोर मांडली. विद्यार्थ्यांचा विरोध तंत्रज्ञानाला नसून, अपारदर्शक आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या परीक्षा व्यवस्थेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संध्याकाळी आंदोलनस्थळी “MPSC जागर” या विशेष भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील समाजप्रबोधनाच्या परंपरेतून प्रेरणा घेत विद्यार्थ्यांनी भजन, अभंग आणि जनजागृतीपर गीतांच्या माध्यमातून शासन आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. शांततापूर्ण आणि संविधानिक मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे एक वेगळी सामाजिक दिशा मिळाली. मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाले.