लोटे : यावर्षी पावसाला तब्बल दीड महिन्याचा उशीर झाल्यामुळे राज्यभर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून त्याचा फटका लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीसह परिसरातील व पंचक्रोशीतील गावांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. औद्योगिक वसाहतीला होणाऱ्या पाणीपुरवठ्यातील अनिश्चिततेमुळे उद्योजकांची चिंता वाढली असून भविष्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशन ने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे केली आहे.
कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीज निर्मितीनंतर सोडण्यात येणाते अवजल वाशिष्ठी नदीत येते. त्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून वालोपे येथील पंपिंग स्टेशन वरून हे पाणी पंपिंग करून लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील महामंडळाच्या जल शुद्धीकरण प्रकल्पात आणले जाते. येथे या पाण्याचे शुद्धीकरण करून लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीसह आजूबाजूच्या गावांना पुरविले जाते. मात्र या पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे कोयना प्रकल्पातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे पाणीपुरवठ्यात खंड पडण्याची शक्यता कायम असते. उद्योगांसाठी पाणी हे अत्यावश्यक बाब असल्याने अशा प्रकारच्या अनिश्चिततेचा कारखान्यांच्या उत्पादनावर तसेच परिसरातील औद्योगिक वातावरणावर आणि पंचक्रोशी सह संपूर्ण जिल्ह्यातील रोजगारावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच यासाठी आतापासूनच ठोस नियोजन करण्याची गरज उद्योजकांकडून व्यक्त होत आहे.
यावर्षी उशिरा सुरू झालेल्या आणि सरासरीपेक्षा कमी पडलेल्या पावसामुळे संपूर्ण राज्यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. या पार्श्वभूमीवर लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशन ने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुंबई येथे भेट घेऊन संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याची मागणी यापूर्वीच केली आहे. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी असोसिएशनच्या वतीने विविध पर्याय सुचविण्यात आले. यामध्ये शेलारवाडी धरणातून पाणी उपलब्ध करून घेणे तसेच वाशिष्टी नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधणे किंवा कोळकेवाडी धरणातून लोटे परशुराम एमआयडीसीला थेट पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना करणे अशा प्रकारचे पर्याय सुचवण्यात आले. दरम्यान कोयना धरणातील पाणीसाठा ही कमी होत असल्याने उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक बनले आहे. त्याचबरोबर कोळकेवाडी धरणातून गुरुत्व बला द्वारे पाईपलाईन मधून थेट वालोपे येथील उदंचन पंपापर्यंत पाणी आणल्यास पाण्याचा अपव्यय टाळता येईल आणि औद्योगिक वसाहतीतील पाणीपुरवठ्याची समस्या कमी होण्यास मदत होईल, अशा प्रकारच्या सूचना आणि पर्यायही असोसिएशन च्या वतीने एमआयडीसी समोर ठेवण्यात आले.
लोटे परशुराम औद्योगिक वसाहत ही परिसरातील रोजगार आणि आर्थिक उलाढालीचे दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत केवळ पाणीपुरवठ्या अभावी उद्योगांवर परिणाम झाला तर याचे दुरगामी परिणाम परिसरातील जनजीवन, बाजारपेठ आणि रोजगारावर होऊ शकतो म्हणूनच वरील सर्व सूचनांचा आणि पर्यायांचा एमआयडीसी आणि शासनाने गांभीर्याने विचार करून बुद्ध पातळीवर यावर उपाययोजना कराव्यात,अशी मागणी यावेळी करण्यात आली. या संयुक्त बैठकीला एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता सतीश पवार, कार्यकारी अभियंता विद्युत व यांत्रिकी विभाग प्रेरणा नागवेकर ,उपअभियंता किशोर हळदणकर, उप अभियंता विद्युत व यांत्रिकी विभाग ज्ञानदेव सोनवणे, उपअभियंता पाटबंधारे विभाग विपुल खोत,उपअभियंता संदीप पवार आर एस पिंपळे व अधिकारी तसेच उद्योजक संघटनेचे अध्यक्ष ॲड. राज आंब्रे, सचिव राजकुमार जैन, संचालक डॉ. प्रशांत पटवर्धन, विश्वास जोशी, राजेश तिवारी, मंदार आडीवरेकर यांच्यासह उद्योजक आणि व्यवस्थापक उपस्थित होते.
लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीवर पाणीटंचाईचे संकट,कायमस्वरूपी उपाययोजनांची उद्योजकांची मागणी…
