जळगाव:- यंदा महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात कमी पेरणी झाली आहे यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. खडसे म्हणाल्या, दुष्काळाची परिस्थिती प्रचंड गंभीर आहे मात्र ‘हम हमारी मौज में, दुनिया हमारी खोज में’ या परिस्थिती राज्य सरकार आहे.

याबाबत त्यांनी सविस्तरपणे सोशल मीडियावर लिहिले आहे. त्यात त्या म्हणाल्या की, यंदा महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात कमी पेरणी झाली आहे. ही बातमी मोठ्या संकटाचा इशारा आहे, राज्यातील शेतकऱ्यांवर ओढवलेल्या भीषण दुष्काळाचे आणि आर्थिक संकटाचे जळजळीत वास्तव आहे! सरकार पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीची घोषणा करून मोकळे झाले पण शेतकऱ्यांना पैसे मिळाले का ? नाही ! मदतीची घोषणा करून सरकारची जबाबदारी संपत नाही; शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणे महत्त्वाचे आहे. पण सरकारचा कारभार म्हणजे वाऱ्यावरची वरात असा आरोप त्यांनी केला.

खासदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी आणि डीलिमिटेशन बिलाला त्यांनी पाठिंबा देण्यासाठी १५० कोटींचा भाव लावला जात असल्याचे ऐकले. सरकारमधील नेते आमदार फोडण्यासाठी, विरोधकांनी जनतेच्या पाठिंब्यावर मिळवलेली सत्ता हिसकावून घेण्यासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी जितके डोके लावतात, पाण्यासारखा पैसा खर्च करतात पण हीच तत्परता शेतकऱ्यांना मदत करताना दिसत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.