मंडणगड : शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना चालणे अत्यंत कठीण झाले आहे. खड्ड्यांमुळे दररोज लहान-मोठे अपघात होत असून, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने वाहनांचे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच ऐन गणपतीच्या सणामध्ये नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये मुंबई, पुणे येथून तालुक्यामध्ये लाखो गणेश भक्त मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे रस्त्यांची तातडीने योग्य ती दुरुस्ती करणे गरजेचे असून याची आपण गंभीरपणे दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वी स्थानिक प्रशासनाकडे तोंडी व लेखी तक्रार व मागणी केली होती. परंतु त्यावर घाई गडबडीने ज्या ठिकाणी खड्डे ऐन पावसात पडत असताना काँक्रीटने खड्डे बुजविले होते, त्या ठिकाणी दोन दिवसातच पुन्हा खड्डे पडल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आपल्या नगरपंचायत प्रशासनाने व बांधकाम विभागाने कोणत्या इंजिनिअरच्या व अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सदरील काम केले याबाबत हास्यास्पद प्रतिक्रिया येत आहेत. मंडणगड शहराची शिवसेना-भाजपचे महायुतीचे नगरपंचायत समोरील रस्त्यावर प्रवास करताना चंद्रावर आल्याचे भासते, अशी आमच्यासह नागरिकांची प्रतिक्रिया येत आहे. तसेच नगरपंचायतीच्या कार्यक्रमावेळी शहरासह येणाऱ्या नागरिक प्रश्न उपस्थित करीत आहेत. तरी या कामाची योग्य ती चौकशी करून नगरपंचायतीचे पैसे वाया गेल्याने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी.
तीन दिवसांची मुदत; अन्यथा आंदोलन!
तरी नागरिकांची गैरसोय आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी या रस्त्यावरील खड्डे येत्या तीन दिवसात बुजवून रस्ता सुस्थितीत करावा. अन्यथा नगरसेवक व नागरिकांसमवेत उग्र आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नगरपंचायत विरोधी पक्ष गटनेते विनोद वसंत जाधव यांनी मुख्याधिकाऱ्यांरी मंडणगड यांना ८ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या निवेदनातून दिला आहे.