चिपळूण : तालुक्यातील वालोपे येथे मुंबई-गोवा महामार्गावर घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत एका निष्पाप चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे आई-वडील गंभीर जखमी झाले.
एका निष्पाप लेकराचा जीव गेल्यानंतर संतप्त नागरिकांनी थेट महामार्गावर उतरून रास्ता रोको आंदोलन छेडले आणि मुंबई-गोवा महामार्ग तब्बल अनेक तास ठप्प झाला. दोन्ही बाजूंना पाच ते सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. पण प्रश्न असा आहे की, प्रशासन अजून किती बळी घेतल्यावर जागे होणार?
वालोपे, बहादूरशेख नाका, फरशी तिठा, जागृती मोटर्स परिसर, रेल्वे स्टेशन परिसर, बरूमतळी-पॉवरहाऊस जोडरस्ता, पिंपळी ते कुंभार्ली घाट… चिपळूण तालुक्यातील अनेक भाग आज अक्षरशः अपघातांचे हॉटस्पॉट बनले आहेत. स्थानिकांच्या मते हा केवळ अपघातांचा प्रश्न राहिलेला नसून हा प्रशासनाच्या नियोजनशून्य, बेजबाबदार आणि बेफिकीर कारभाराचा थेट परिणाम आहे.
वालोपेतील निष्पाप चिमुरडीचा मृत्यू हा केवळ एक अपघात नाही तर तो कोकणातील नागरिकांच्या जीवाशी चाललेल्या प्रशासनाच्या खेळाचा रक्तरंजित पुरावा असल्याची भावना आता सर्वसामान्यांमध्ये तीव्र होताना दिसत आहे. महामार्ग विकासाच्या नावाखाली जर सामान्य माणसाचाच बळी जात असेल, तर हा विकास नेमका कोणासाठी? हा प्रश्न आता चिपळूणच्या जनतेने थेट प्रशासनाच्या दारात नेऊन उभा केला आहे.
