मुंबई दि. २५ (प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समिती बैठकीमध्ये नगरसेवक व स्थायी समिती सदस्य तेजिंदर सिंग तिवाना यांनी मालाड येथील Rejoice School संदर्भात अत्यंत गंभीर हरकतीचा मुद्दा उपस्थित करत शैक्षणिक जागेच्या कथित गैरवापराविरोधात कठोर भूमिका मांडली.
स्थानिक नागरिकांकडून प्राप्त तक्रारीनुसार महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेवर कथितरित्या धर्मांतराच्या हालचाली, प्रार्थना सभा, श्रद्धेच्या नावाखाली उपचार, भोंदूगिरी व लोकांच्या धार्मिक भावना प्रभावित करण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०७७०/२०२६ दिनांक ११ मे २०२६ रोजी नोंद करण्यात आल्याचेही सभागृहाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
तिवाना यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “शाळा ही शिक्षणाचे मंदिर आहे. शैक्षणिक जागेचा वापर धर्मांतर, अंधश्रद्धा किंवा लोकांवर मानसिक प्रभाव टाकण्यासाठी होणे अत्यंत गंभीर बाब आहे. महानगरपालिकेच्या जागेचा वापर मूळ उद्देशापासून विचलित होऊन होत असेल तर त्याची तात्काळ चौकशी झालीच पाहिजे.”