रायगड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील मध्य रायगड क्षेत्राच्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर केल्या असून, नागोठणे शहराध्यक्षपदी प्रभाकर तांडेल यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत नागोठणे शहराची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना प्रभाकर तांडेल यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले. तसेच रायगड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब म्हात्रे आणि रोहा तालुकाध्यक्ष साईनाथ धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिलेल्या संधी व जबाबदारीला पूर्ण न्याय देण्याचा निर्धार व्यक्त केला. नागोठणे परिसरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना प्राधान्य देत शुद्ध पाणीपुरवठा, महापुरामुळे निर्माण होणाऱ्या समस्या तसेच स्थानिक उद्योग व प्रकल्पांमध्ये स्थानिक युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नागोठणे शहरातील अनेक भागांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून, नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा मिळावा यासाठी प्रभावी शुद्ध पाणी योजना राबविण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. तसेच पावसाळ्यात वारंवार उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना व्हाव्यात, यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, नागोठणे परिसरात कार्यरत असलेल्या विविध उद्योग, कंपन्या व प्रकल्पांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मनसेच्या माध्यमातून लढा उभारला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पक्षसंघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्यावर विशेष भर देणार असून, नव्या कार्यकर्त्यांना संधी देत मनसेची ताकद वाढविण्यासाठी व्यापक जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार असल्याचे प्रभाकर तांडेल यांनी सांगितले.

या नियुक्तीमुळे नागोठणे शहरातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात स्थानिक प्रश्नांवर पक्ष अधिक आक्रमकपणे भूमिका घेईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.